Ad will apear here
Next
मोदींची भाषानीती - सब अच्छा है!
गेल्या रविवारी अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाची जगभर चर्चा झाली. जगाचे लक्ष असूनही इंग्रजीची निवड न करता मोदींनी भाषणासाठी हिंदी भाषेची निवड केली. तसेच, आणखी आठ भाषांतील वाक्ये उच्चारून त्यांनी देशातील वैविध्य कृतीतून दाखवून दिले. हे मोदींच्या नीतीचे वैशिष्ट्य आहे.
................
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हा प्रत्यक्ष क्रिकेट खेळत असे, तेव्हा त्याच्या बाबतीत असे सांगितले जात असे, की तो तोंडाने नव्हे तर बॅटने बोलतो. बोलेल तो गर्जेल काय, या न्यायाने तो आपल्या कामगिरीनेच विरोधकांची तोंडे गप्प करायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या वक्तृत्वासाठी ओळखले जात असले, तरी कधी कधी ते शब्दांऐवजी कृतीतूनच संदेश देतात. भारतात एकीकडे भाषेच्या मुद्द्यावरून एकमेकांचा गळा धरणाऱ्या देशवासीयांना मोदींनी साता समुद्रापार एकतेची मात्रा दिली, तेही कोणतेही प्रत्यक्ष शब्द न वापरता. ‘लेकी बोले सुने लागे’ या थाटाने त्यांनी एका फटक्यात भाषांचे वाद मोडीत काढले नि तेही अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना. कूटनीती आणि राजनय यांमध्ये कौशल्य दाखवल्यावर मोदींनी भाषानीतीतही आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. त्यांचे हे पाऊल देशाच्या एकतेच्या दिशेने एक मोठी धाव ठरू शकते. त्यांच्याच शैलीत सांगायचे झाले, तर ‘सब अच्छा है!’

गेल्या रविवारी टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन येथे ‘हाउडी मोदी’ हा कार्यक्रम झाला. त्यात काय काय झाले आणि तेथे मोदींनी कशी सभा जिंकली, याचे इत्थंभूत वर्णन वेगवेगळ्या मार्गाने आले आहे. त्याची पुनरुक्ती येथे करण्याची गरज नाही; मात्र या वेळी त्यांनी ज्या प्रकारे देशातील विविध भाषांतील वाक्ये उच्चारून त्या-त्या प्रांतीयांच्या मनाला हात घातला, ते लाजवाब होते.

या कार्यक्रमात ५० हजारांपेक्षा जास्त भारतीय उपस्थित होते. त्याशिवाय कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्यांची संख्या वेगळी. पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाच्या व्यासपीठाचा पूर्ण उपयोग करून अनेक गोष्टी सांगितल्या; मात्र त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट ठरली ती भाषणाची भाषा. हा एक लक्षणीय मुद्दा आहे. समोर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा स्वप्रतिमेवर फिदा असलेला अमेरिकेचा अध्यक्ष बसलेला, समोर भारताच्या विविध प्रांतांतून आलेले हजारो लोक, संपूर्ण जगाची नजर या कार्यक्रमाकडे रोखलेली... आणि याला वरताण ‘जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवण्याची हौस असलेला नेता’ असा विरोधकांकडून होणारा आरोप. अन्य कुठलाही नेता असता तरी त्याने अशा प्रसंगी भाषणासाठी इंग्रजीची निवड केली असती; मात्र तरीही त्यांनी हिंदीची निवड केली. का? तर ‘माध्यम हाच संदेश असतो’ (मीडियम इज दी मेसेज) हा कॅनडाचे माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांनी मांडलेला सिद्धांत.

‘हाउडी मोदी’च्या निमित्ताने जगाला भारताची ताकद दाखवण्याची मोदींची योजना होती. त्यासाठी हिंदीची निवड करून त्यांनी हे दाखवून दिले, की जास्तीत जास्त भारतीय समजत असलेली हीच भाषा आहे. ‘तुम्ही मला विचाराल, की हाउडी मोदी, तर मी म्हणेन, भारत में सब अच्छा है,’ असे ते म्हणाले आणि त्यानंतर एकामागोमाग एक अशा आठ भाषांत त्यांनी हेच वाक्य उच्चारले. पंजाबीतील ‘सब चंगा सी’, गुजरातीतील ‘बधा मजामा छे’, तमिळमधील ‘एल्लाम सौक्कियम’, तेलुगूतील ‘चाला बागुंदी’ आणि बंगालीतील ‘सब खूब भालो’ या त्यांच्या वाक्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, ‘माझ्या अमेरिकी मित्रांना याचे आश्चर्य वाटते आहे, की मी काय म्हणालो. अध्यक्ष ट्रम्प आणि माझ्या अमेरिकी मित्रांनो, मी विविध भारतीय भाषांमध्ये हेच म्हणालो, की सगळं काही ठीक आहे.’ इतकेच नाही, तर भारतात भाषांचे वैविध्य आहे आणि हीच भारताची शक्ती आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मोदी यांच्या या कृतीला पार्श्वभूमी होती ती एका दुर्दैवी वादाची. केवळ काही दिवस आधीच, हिंदी दिनाच्या निमित्ताने, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा होऊ शकते, असे वक्तव्य केले होते. त्याला सगळीकडून विरोध झाला. त्यात दाक्षिणात्य राज्ये आणि इंग्रजी माध्यमे आघाडीवर होती. त्या संबंधातील घटनेवर प्रत्यक्ष भाष्य न करता मोदींनी भाषणाचे माध्यमच हिंदी भाषा निवडून एक संदेश दिला. हिंदीत केलेले आपले भाषण अमेरिकेतील प्रत्येक भारतीयाने ऐकले; मात्र त्यांतील कोणीही हिंदी आपल्यावर लादली गेल्याचे म्हटले नाही. याला कारण म्हणजे या भाषा शेकडो वर्षांपासून पुढे जात आहेत आणि आजही त्या कोट्यवधी भारतीयांच्या मातृभाषा आहेत, हे मोदींनी स्पष्ट केले होते.

हिंदी आमच्यावर लादली जात आहे आणि म्हणून आम्ही हिंदीला विरोध करतो, हा सूर लावणाऱ्यांची मुख्य तक्रार हीच असते. हा विरोध करणारे काही सर्वच बनचुके नसतात. त्यातील अनेक जण प्रामाणिक तळमळीने आणि स्वभाषेच्या प्रेमापोटी हिंदीला विरोध करतात; मात्र हिंदीच्या कैवाऱ्यांकडून आपल्या भाषेला म्हणावा तसा आदर दिला जात नाही, आमच्या भाषेला अडगळीत टाकले जात आहे अशी त्यांची भावना असते. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे भारतातील अन्य भाषांनाही हिंदीच्या बरोबरीने वागवणे.

शहा यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कन्नड व तमिळभाषक अनेक संघटनांनी केंद्र सरकारवर हिंदी भाषा जबरजस्तीने लादण्याचा आरोप करून निदर्शने आणि धरणे आंदोलन केली होती. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात त्या वेळी झालेल्या आंदोलनाच्या वेळेस केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते डी. व्ही. सदानंद गौडा यांनी महत्त्वाचे भाष्य केले होते. ‘प्रादेशिक भाषांचे महत्त्व सरकार कमी करत नसून, हिंदी भाषाही महत्वाची आहे. हिंदी देशाच्या एकीकरणासाठी महत्त्वाची असून, हिंदीचा वापर म्हणजे इतर भाषांवर अन्याय किंवा दडपणे नव्हे,’ असे ते म्हणाले होते.

मोदींनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश हाच आहे. त्यांची स्वतःची मातृभाषा गुजराती; मात्र हिंदीतून संवाद साधणे ही त्यांची खासियत. जी भाषा आपल्याला सर्वांत चांगली येते आणि जी जास्तीत जास्त (सर्वांना नव्हे) सहज समजते तिचा अंगीकार आपण करत राहू; मात्र अन्य भाषांबाबतही आपण तेवढाच आदरभाव राखू. तो आदरभाव दाखवण्यातही कसूर करणार नाही, हे त्यांनी निःशंकपणे मान्य केले. यातच त्यांच्या नीतीचे यश आहे आणि ही नीती जर कायम राहणार असेल तर ‘सर्व काही चांगले आहे.’

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZQMCE
Similar Posts
‘हाउडी मोदी?’; ‘सगळे छान चालले आहे!’ ह्यूस्टन : ‘१३० कोटी भारतीयांच्या आदेशानुसार काम करणारा मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ‘हाउडी मोदी’ (मोदी, तुम्ही कसे आहात) असा प्रश्न विचारता, तेव्हा तो प्रश्न साऱ्या भारतीयांसाठी असतो. म्हणूनच त्या प्रश्नाचे उत्तर मी साऱ्या भारतीयांच्या वतीने देतो आहे. भारतात सगळे छान चालले आहे,’ अशा
हा सगळा खेळ चर्चेचा! दर वर्षी हिंदी दिवस येतो, दर वर्षी सरकारातील मंत्री किंवा अधिकारी एखादे वक्तव्य करतात आणि त्यावरून वादाचा धुरळा उडतो. तेच तेच चेहरे तेच तेच जुने युक्तिवाद करतात आणि त्याच त्याच जुन्या अभिनिवेशाला लोक फशी पडतात. साधारणतः आठवडाभर किंवा महिनाभर हा खेळ चालतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या!
चौथी, पाचवी नव्हे; भाषा एकच...पैशाची! गुगल असिस्टंट आता हिंदी व मराठीसह आठ भाषांमध्ये वापरता येणार असल्याचे गुगलने नुकतेच जाहीर केले. अॅलेक्सा हे आपले उपकरण हिंदी व हिंग्लिशमध्ये संभाषण करू शकेल, असे अॅमेझॉनने जाहीर केले. भारताची बाजारपेठ काबीज करायची असेल, तर बाजारपेठेची भाषा बोलायला पाहिजे, हे इंगित या कंपन्यांना पुरते कळून चुकले आहे.
स्वल्पविराम... मुक्त पत्रकार आणि अनुवादक देविदास देशपांडे यांचे भाषाविषयक सदर दर सोमवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होत होते. त्याचा समारोप करणारा हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language